जालन्यातील युवकांसाठी सुवर्णसंधी: ‘मॅजिक आयटीआय इनक्युबेशन सेंटर’मुळे उद्योजक होण्याचा मार्ग खुला!
By तेजराव दांडगे

जालन्यातील युवकांसाठी सुवर्णसंधी: ‘मॅजिक आयटीआय इनक्युबेशन सेंटर’मुळे उद्योजक होण्याचा मार्ग खुला!
जालना, दि. २६ सप्टेंबर २०२५ – जालना जिल्ह्यातील युवकांना उद्योजक बनण्याची आणि आपल्या कल्पनांना व्यवसायात उतरवण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. हुतात्मा जनार्दनमामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) परिसरात ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील युवकांना ‘आयडीया ते इन्कम टॅक्स धारक’ असा प्रवास साध्य करण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
जालना आयटीआयमध्ये झालेल्या उद्घाटन समारंभात मंत्री महोदय बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि मॅजिक संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार बळ: मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, हे इनक्युबेशन सेंटर युवकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवून कौशल्याधारित उद्योग सुरू करण्यासाठी मदत करेल. फक्त रोजगार निर्मिती न करता, युवकांनी आपले उत्पन्न वाढवून आयकरधारक होण्याची संधी या सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यांनी युवकांना आवाहन केले की, आई-वडिलांच्या अपूर्ण इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नवकल्पना मांडून यशस्वी उद्योजक बनावे.
त्वरित सुरू होणारे नवीन अभ्यासक्रम: यावेळी मंत्री लोढा यांनी उमेदवारांशी थेट संवाद साधला आणि आयटीआयमध्ये अपेक्षित असलेल्या अभ्यासक्रमांची विचारणा केली. युवकांनी सुचवलेल्या मागणीनुसार, ड्रोन ऑपरेटर, सोलार टेक्नीशियन, इलेक्ट्रिक व्हेइकल टेक्नीशियन, ब्युटी थेरपिस्ट आदी अभ्यासक्रम ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हमखास रोजगार देणारे प्रशिक्षण म्हणून सुरू करण्याचे निर्देश त्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागास दिले.
राज्यातील पहिला प्रकल्प: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मॅजिक इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून स्वत:चा स्टार्टअप सुरु करण्याची संधी जिल्ह्यातील युवकांना मिळाली आहे. अशी संधी देणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेले डिझाईन, भांडवल तसेच मार्गदर्शन व मदत या सेंटरद्वारे उपलब्ध झाली आहे. जास्तीत-जास्त नवसंकल्पनाधारकांनी मॅजिक इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपली नोंदणी करून यशस्वी उद्योजक बनावे. तसेच, ग्रामीण भागातील नवसंकल्पनाधारक युवक-युवतींसाठी लवकरच तालुकास्तरावरही मॅजिकप्रमाणे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सेंटरच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील युवा शक्तीला एक नवी दिशा मिळणार असून, ही उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.