भोकरदन: ‘हलगर्जीपणा’ नडला! पारध गावातील सुमारे २०० शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित; तातडीने मदत देण्याची मागणी
By गौतम वाघ

भोकरदन: ‘हलगर्जीपणा’ नडला! पारध गावातील सुमारे २०० शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित; तातडीने मदत देण्याची मागणी
जालना/प्रतिनिधी: जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये पारध गावातील जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी अजूनही 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी (गारपीट) अनुदानापासून वंचित आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची ही मदत थांबल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कागदपत्रे जमा करूनही त्यांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.
वारंवार कागदपत्रे देऊनही मदत नाही
पारध येथील संतप्त शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनुदानासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दोन वेळा ग्रामसेवक यांच्याकडे जमा केली आहेत. या कागदपत्रांचा पाठपुरावा करूनही प्रशासकीय स्तरावर दिरंगाई झाली आहे.
या वंचित शेतकऱ्यांपैकी काही जणांचे विके (Vake) नंबर तयार झाले आहेत, तर अनेकांचे नाव नुकसान भरपाईच्या यादीतच समाविष्ट झालेले नाही. यामुळे त्यांची केवायसी (KYC) प्रक्रियाही पूर्ण होऊ शकलेली नाही.
सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा संताप
सागर देशमुख (सामाजिक कार्यकर्ते) यांनी या गंभीर प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “पारध येथील जवळपास २०० शेतकऱ्यांचे गारपीट अनुदान अजून आलेले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे विके नंबर तयार असूनही पैसे जमा झालेले नाहीत, तर अनेक शेतकऱ्यांची यादीत नाव नसल्यामुळे केवायसी पेंडिंग आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे.”
शेतकऱ्याचा अनुभव:
या नुकसानीचा फटका बसलेल्या सुदर्शन लोखंडे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. “मी माझ्या शेतात हरभऱ्याची लागवड केली होती. गारपीट झाल्यामुळे मला शेतातून एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले, पण मला अजूनही मदत मिळाली नाहीये,” असे ते म्हणाले. लोखंडे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून तलाठी, कृषी सहाय्यक आणि तहसील कार्यालयात कागदपत्रांचा सतत पाठपुरावा केला आहे. “माझी केवायसी होऊन जवळपास सहा महिने झाले आहेत, तरीही मला गारपिटीचा अनुदान जमा झालेला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मागणी:
जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, स्थानिक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि वंचित राहिलेल्या पारध गावातील २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.