तालुक्यात ‘संस्कृती’ची ‘बाजी’! भोकरदन कुस्ती स्पर्धेत ६६ किलो गटात मारले मैदान
By देवानंद बोर्डे (पिंपळगाव रेणुकाईच्या संस्कृती देशमुखची जिल्हा स्तरासाठी निवड)

तालुक्यात ‘संस्कृती’ची ‘बाजी’! भोकरदन कुस्ती स्पर्धेत ६६ किलो गटात मारले मैदान; पिंपळगाव रेणुकाईच्या संस्कृती देशमुखची जिल्हा स्तरासाठी निवड
पिंपळगाव रेणुकाई, दि. २५: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका कुस्ती स्पर्धेत पिंपळगाव रेणुकाईच्या संस्कृती संदीपराव देशमुख या गुणवान विद्यार्थीनीने आपली प्रतिभा सिद्ध करत मोठे यश संपादन केले आहे. भोकरदन येथील जिल्हा परिषद क्रीडांगणावर नुकत्याच आयोजित झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या ६६ किलो वजनी गटातील लाल मातीवरच्या लढतीत संस्कृतीने अजिंक्यपद (पहिला क्रमांक) मिळवून जोरदार बाजी मारली.
ग्रामीण भागातून जिल्हा स्तरावर झेप
पिंपळगाव रेणुकाईसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संस्कृतीने या यशाने केवळ तालुका स्तरावरच नव्हे, तर जालना जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली आहे. या विजयामुळे तिची थेट जालना जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्कृती केवळ कुस्तीतच नव्हे, तर वेटलिफ्टिंगसह इतरही विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय असून तिने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
शिक्षक आणि वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन
आपल्या या यशाचे श्रेय देताना संस्कृतीने शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि विशेषतः तिचे वडील संदीप देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
भोकरदन येथील या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक धम्मदिप काकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. यशस्वी स्पर्धेसाठी कृष्णा जंजाळ, गोविंद शिंदे, जी डी खांडे, अजय मतकर, किरण साळवे, सी पि झालटे, प्रदिप बोर्डे, श्रीमंत ए सी देशमुख यांच्यासह अनेकांनी विशेष योगदान दिले.
संस्कृतीच्या या चमकदार कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि तिला जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.