
गळफास घेतल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पारध (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील सुंदरवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोपीनाथ अशोक गवळी (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पारध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोपीनाथ याने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला असल्याचे त्याच्या भावाने (आकाश अशोक गवळी) पाहिले. त्यानंतर त्याला तात्काळ वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर हे करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे सुंदरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.