आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
By तेजराव दांडगे

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना, ४ सप्टेंबर: जालना जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ‘आदि कर्मयोगी अभियान योजने’च्या माध्यमातून जिल्ह्यातील २४ गावांमध्ये हे कार्य हाती घेण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत आवास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीजजोडणी, सामुदायिक सुविधा, दूरसंचार, बाजारपेठा, स्वच्छतागृहे, कृषी आणि मनोरंजनाच्या साधनांचा विकास करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
त्यांनी तालुका मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. दूरसंचार विभागानेही संबंधित गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करून जोडणीबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाशी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे, जेणेकरून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल. आदिवासी समाजातील कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचनाही श्रीमती मित्तल यांनी यावेळी केली.
या बैठकीला तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.