जालन्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर २११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By तेजराव दांडगे

जालन्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर २११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जालना, (दि. १९ ऑगस्ट २०२५): आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पडावेत यासाठी जालना पोलिसांनी जिल्ह्यात विशेष प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत अंबड आणि परतूर उपविभागात विविध गुन्ह्यांमधील एकूण २११ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम सुरू आहे.
अंबड उपविभागातील कारवाई:
दिनांक १६ ऑगस्ट रोजी अंबड उपविभागात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये अंबड पोलीस ठाण्यात २२, घनसावंगी येथे ११, गोंदी येथे ४६ आणि तीर्थपुरी पोलीस ठाण्यात ७ अशा एकूण ८६ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
परतूर उपविभागातील कारवाई:
दिनांक १९ ऑगस्ट रोजी परतूर उपविभागातही अशीच मोहीम राबवण्यात आली. यात परतूर पोलीस ठाण्यात ३५, मंठा येथे १२, आष्टी येथे ४८, मौजपुरी येथे १८ आणि सेवली पोलीस ठाण्यात १२ अशा एकूण १२५ आरोपीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जालना पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव (२७ ऑगस्टपासून) आणि ईद-ए-मिलाद (०५ सप्टेंबर) हे दोन्ही सण शांततेत, प्रेमाने आणि सामुदायिक सलोख्याने साजरे करावेत, असे आवाहन सर्व जनतेला केले आहे. उर्वरित उपविभागांमध्येही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.