जागतिक धम्म परिषद: बुलढाण्यात ११ ऑक्टोबरला होणार आयोजन; मूकनायक फाउंडेशनद्वारे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
By अनिल जाधव

जागतिक धम्म परिषद: बुलढाण्यात ११ ऑक्टोबरला होणार आयोजन; मूकनायक फाउंडेशनद्वारे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
बुलढाणा – मूकनायक फाउंडेशनतर्फे येत्या ११ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात एका जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारत, चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, मलेशियासह अन्य बौद्ध राष्ट्रांमधील नामांकित भिक्खू सहभागी होणार आहेत.
या परिषदेदरम्यान, कला, वैद्यकीय, संरक्षण, विधी, शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, समाजकार्य, साहित्य आणि प्रशासन यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘मूकनायक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींना आपल्या कार्याचा अहवाल दोन प्रतींमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत पाठवण्याचे आवाहन केले आहे.
या परिषदेच्या निमित्ताने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी बिझनेस एक्स्पोचेही आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये उद्योजक, महिला बचत गट आणि इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही सतीश पवार यांनी केले आहे. गेल्या वर्षीच्या परिषदेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यात होणारी ही परिषद बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.