परतूरात अवैध तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; चार तलवारी जप्त
By तेजराव दांडगे

परतूरात अवैध तलवारी बाळगणाऱ्या दोघांना अटक; चार तलवारी जप्त
परतूर, दि. ०८ : परतूरात अवैध तलवारी बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या आदेशानुसार, परतूरात दोन आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण चार धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.
पोलिस निरीक्षक एस.बी. भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, परतूर-पारडगाव रस्त्यालगतच्या एका घरात आणि रेल्वे स्टेशनसमोरच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक अवैधरित्या तलवारी बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भागवत यांनी दोन पथके तयार केली.
पोलिसांच्या एका पथकाने परतूर-पारडगाव रस्त्यावरील संतोष लक्ष्मण काळे (वय ३२) याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे तीन धारदार तलवारी आढळून आल्या. दुसऱ्या पथकाने रेल्वे स्टेशनसमोर छापा टाकला असता, गिरधारी दादाराव पवार (वय ४३) याच्याकडे एक तलवार सापडली. पोलिसांनी एकूण चार तलवारी जप्त केल्या असून, संतोष काळे आणि गिरधारी पवार या दोन्ही आरोपीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक एस.बी. भागवत, पोउपनि अमोल रावते, धर्मा शिंदे, किरण मोरे, गजानन राठोड, विजय जाधव, नरेंद्र चव्हाण, दशरथ गोषनवाड, पवनकुमार धापसे, महिला अंमलदार कल्पना धडे आणि आय.टी. सेलचे सागर बाविस्कर यांचा सहभाग होता.