लेहा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, भक्तीमय वातावरणात महाप्रसादाचा लाभ
By बाळकृष्ण उबाळे

लेहा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, भक्तीमय वातावरणात महाप्रसादाचा लाभ
लेहा, दि. ०१: भोकरदन तालुक्यातील लेहा गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाली. श्रावण महिन्याच्या निमित्ताने २५ जुलैपासून सुरू झालेल्या या सप्ताहात गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
सप्ताहाच्या सांगतेनिमित्त ह.भ.प. साक्षीताई अपार यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांनी आपल्या कीर्तनात श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गेल्या आठवडाभर चाललेल्या या सप्ताहात संगीतमय शिवमहापुराण कथा, काकड आरती, हरी जागर, कीर्तन आणि एकनाथी भारुड असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या सप्ताहाला परिसरातील वारकरी, भजनी मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. भजन, कीर्तन आणि भारुडाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, हुंडाबळी यांसारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली.
सप्ताहाची सांगता पालखी मिरवणुकीने झाली. त्यानंतर मारुती मंदिरासमोर दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. ह.भ.प. साक्षीताई अपार यांनी या सप्ताहात आलेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले. शेवटी महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता झाली.