आडगाव (भोंबे) येथे रोकडोबा महाराजांचे भव्य मंदिर; ३७५ वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा कायम
By गोकुळ सपकाळ

आडगाव (भोंबे) येथे रोकडोबा महाराजांचे भव्य मंदिर; ३७५ वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा कायम
भोकरदन, दि. ०१: तालुक्यातील आडगाव (भोंबे) गावात सुमारे ३७५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या रोकडोबा महाराजांचे दक्षिणमुखी मंदिर आता गुलाबी रंगाच्या बन्सी दगडांनी भव्य स्वरूपात उभे राहिले आहे. रोकड पावणारा (लगेच इच्छा पूर्ण करणारा) म्हणून रोकडोबा हे नाव पडले असून, हे मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. दर शनिवारी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे, हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी सलग पाच दिवस महाप्रसादाची परंपरा गावकऱ्यांनी आजही जपली आहे.
मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
अनेक वर्षांपूर्वी गावाजवळच्या ओढ्यातून वाहत आलेली रोकडोबा महाराजांची शिळा मूर्ती गावाच्या पश्चिम दिशेस स्थिरावली. हा ईश्वरी संकेत मानून गावकऱ्यांनी याच ठिकाणी तिची स्थापना केली. १९७१ साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रयत्न झाला, तेव्हा मूर्ती हलवण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक गावात माकडांनी धुडगूस घातला. हा दैवी संकेत मानून गावकऱ्यांनी मूर्ती आहे त्याच जागी ठेवून जीर्णोद्धार केला. त्यानंतर ५० वर्षांनी, २०१९ मध्ये लोकवर्गणीतून तब्बल पावणेचार कोटी रुपये खर्चून मंदिराच्या नवीन भव्य बांधकामाला सुरुवात झाली आणि १ जानेवारी २०२४ रोजी हे काम पूर्ण झाले.
गावाची ओळख
आडगाव (भोंबे) हे गाव शेतीप्रधान आहे. गावातील अनेक तरुण उच्च पदांवर कार्यरत असून ५० हून अधिक तरुण भारतीय सैन्यात सेवा देत आहेत. ९५ टक्क्यांहून अधिक साक्षरता असलेल्या या गावात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असली तरी इतर समाजाचे लोकही गुण्यागोविंदाने राहतात. गावातील बहुतेक व्यक्तींचे आडनाव ‘भोंबे’ असल्याने हे गाव ‘आडगाव (भोंबे)’ नावाने ओळखले जाते.
गावातील हनुमान जन्मोत्सवाचा महाप्रसाद देण्यासाठी भक्तांना १० ते २० वर्षे वाट पाहावी लागते. सध्या २०२९ पर्यंतच्या कार्यक्रमांचे नियोजन आधीच झालेले आहे. सिल्लोड येथून दिवसातून एसटी बसच्या सहा फेऱ्या या गावाला जोडतात.