जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ₹4.34 लाखांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ₹4.34 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. ३१: शहरातील रहेमानगंज येथील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांनी धाड टाकून 11 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, चार मोटारसायकल, आणि 11 मोबाईल असा एकूण ₹4 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई 31 जुलै 2025 रोजी करण्यात आली. पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रहेमानगंज येथील रहिवासी महेश बिरादार यांच्या घरातील वरच्या मजल्यावर काही लोक ‘तोरंट’ नावाचा जुगार खेळत आहेत.
माहितीची खात्री पटल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक श्री. संदीप भारती यांच्या आदेशानुसार, डी.बी. पथकाने सायंकाळी 5:37 वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी, 11 पुरुष गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ₹17,000 रोख रक्कम, चार मोटारसायकल आणि 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹4,34,000 आहे.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, पोहेकॉ जगन्नाथ जाधव, नजीर पटेल, पोकॉ दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, राहूल कटकम, मपोकॉ दांडगे आणि चालक सद्दाम सय्यद यांनी केली.