कोठा कोळी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

कोठा कोळी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पारध, दि. २८ जुलै, २०२५: भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पारध पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २७ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास, मौजे कोठा कोळी ते कल्याणी रोडच्या बाजूला असलेल्या पत्राच्या टीन शेडमध्ये हा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोकाँ कृष्णा मोतीराम गवळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांच्या छाप्यात अमोल प्रकाश बावस्कर, महादु नामदेव सोनुने आणि राजू उखाजी वराडे (सर्व रा. कोठा कोळी, ता. भोकरदन, जि. जालना) हे बावन पत्त्यांचा ‘फेक’ नावाचा जुगार खेळ खेळताना रंगेहात पकडले गेले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीतांकडून रोख ६,६५० रुपये (यात ५०० रुपयांच्या १२ नोटा, १०० रुपयांच्या सहा नोटा आणि ५० रुपयांची एक नोट), १५,००० रुपये किमतीचा एक रियलमी कंपनीचा मोबाईल आणि ० रुपये किमतीचे हिरव्या रंगाचे बावन्न पत्त्यांचे जुने वा किं अं. असे एकूण २१,६५० रुपये (एकवीस हजार सहाशे पन्नास रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोतीराम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नेमाने हे करत आहेत. हा गुन्हा सफाँ के.डी. दांडगे यांनी दाखल केला आहे.