पारध बु. येथील युरिया काळाबाजार: माजी सभापतींचा एल्गार, पत्रकार संघाचा पाठिंबा!
शेतकऱ्यांनो, युरियाच्या काळाबाजारावर आता 'हा' नेता आणि पत्रकार संघाची वक्रदृष्टी; पाहा, नेमकं काय घडलंय!

पारध बु. येथील युरिया काळाबाजार: माजी सभापतींचा एल्गार, पत्रकार संघाचा पाठिंबा!
शेतकऱ्यांनो, युरियाच्या काळाबाजारावर आता ‘हा’ नेता आणि पत्रकार संघाची वक्रदृष्टी; पाहा, नेमकं काय घडलंय!
पारध, दि. २१: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी पारध बु. गावात युरिया खताच्या सुरू असलेल्या काळाबाजारावर सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर, पत्रकार संघाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
पारध बु. येथे आरसीएफसी खताची एजन्सी असूनही, शेतकऱ्यांना युरिया खत बाहेरून आणि वाढीव भावाने खरेदी करावे लागत आहे. परमेश्वर लोखंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, युरियाची एक बॅग २६६ रुपयांना विकणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांना ती ३५० रुपयांना घ्यावी लागत आहे. ही जबाबदारी स्थानिक एजन्सीची आहे, परंतु ते न घडता परस्पर गाड्या पार्सल करून २६६ रुपयांचा युरिया ३२० ते ३५० रुपयांना विकल्या जात असून पावती २६६ रुपयांचीच दिली जात आहे. हे धोरण चुकीचे असून शेतकऱ्यांची उघडपणे लूट केली जात असल्याचा आरोप श्री लोखंडे यांनी केला आहे. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचेही सांगितले असून, लवकरच पारध येथे सर्वांना युरिया उपलब्ध होईल आणि कोणीही २६६ रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. जास्त पैसे घेतल्यास त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावर पत्रकार संघांचे तालुका उपप्रमुख रवी लोखंडे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत, “शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांचे कपडे लेखणीच्या माध्यमातून टर टर फाडून त्यांना नागडे केल्या जातील यात तिळमात्र शंका नाही” असे ठामपणे सांगितले आहे. पत्रकार संघाचा तालुका उपाध्यक्ष या नात्याने ते आणि संघाचे सर्व पत्रकार परमेश्वर लोखंडे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे पारध बुद्रुक येथील युरिया काळाबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासकीय कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.