नरामध्ये नारायण शोधून सेवा करणे हेच आमचे ध्येय – मनीष श्रीवास्तव
By तेजराव दांडगे, { मनुष्यसेवा हीच खरी नारायण सेवा: पारध येथे ३२५ दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप)

मनुष्यसेवा हीच खरी नारायण सेवा: पारध येथे ३२५ दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप
पारध, [२० जुलै, २०२५]: ‘नरात नारायण शोधून त्यांची सेवा करावी’ या उक्तीला प्रत्यक्षात आणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी पारध येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डॉ. जीवन राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात ३२५ दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
रविवार, २० जुलै रोजी भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश स्कूल, लालबहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ, स्व. हरिवंशराय बच्चन बहुद्देशीय सेवाभावी संस्था, पारध आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना मनीष श्रीवास्तव यांनी आपण केवळ राजकारणच नाही, तर समाजकारणही करत असल्याचे सांगितले. “वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण” हे आपले सूत्र असून, त्याचाच एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आपली खरी कमाई असल्याचे श्रीवास्तव म्हणाले.
३२५ दिव्यांग बांधवांना मदतीचा हात – स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव शिक्षण प्रसारक मंडळ, साधू वासवानी मिशन आणि पारध बु. ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मनीष श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतून हे समाजकार्याचे कार्य हाती घेण्यात आले. कृत्रिम अवयवांव्यतिरिक्त दिव्यांग बांधवांना सोलापुरी चादर, टॉवेल, छत्री आदी साहित्याचे वाटप करून श्रीवास्तव परिवाराने त्यांना जीवन जगण्यासाठी मदतीचा हात दिला.
मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन – या शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उ.बा.ठाकरे गट) बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांच्या हस्ते, डॉ. जीवन राजपूत, पारधच्या सरपंच शरदा बाबुराव काकफळे, पत्रकार गजानन देशमुख, समाधान तेलंग्रे आणि ग्रामसेवक संजय पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष श्रीवास्तव यांनी केले. यावेळी उपसरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव, समाधान पाटील, नदीम पठाण, समी पठाण, बाबुराव काकफळे, संदीप श्रीसागर, जगदीश लोखंडे, रवी तबडे, गणेश फुसे, सुनील डोईफोडे, गणेश लोखंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
नेते आलेच नाहीत, कार्यकर्ते हिरमुसले!
पारध बु. येथील या शिबिरासाठी शिवसेना नेत्या (उ.बा.ठा. गट) सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शिबिरस्थळी लावण्यात आले होते. परिसरात याबाबत बरीच चर्चाही होती. त्यामुळे आपले नेते येणार म्हणून परिसरातील मोठ्या प्रमाणात शिवसेना (उ.बा.ठा. गट) कार्यकर्ते शिबिरस्थळी दाखल झाले होते. मात्र, हे दोन्ही नेते न आल्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.