पारध पोलिसांची धडक कारवाई: हातभट्टी दारु तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल, आरोपी फरार!
By तेजराव दांडगे

पारध पोलिसांची धडक कारवाई: हातभट्टी दारु तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल, आरोपी फरार!
जालना, (पारध) दि. 19 जुलै: भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी आज सकाळी अवैध दारू निर्मितीवर धडक कारवाई केली आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव रे येथील पाण्याच्या टाकीजवळ, शेलुद शिवारात गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे 300 लिटर आंबट व उग्रट वासाचे मिश्रण जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मामुर अकोस तडवी (वय 50, रा. शेलुद, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीत पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून सध्या पसार झाला आहे.
पोलीस अंमलदार अनुराज रामभाऊ वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीत मामुर तडवी हा विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणारे मिश्रण आणि साहित्य घेऊन उपस्थित होता. पोलिसांनी आणि पंचांनी पाहताच आरोपीत घटनास्थळावरून पळून गेला.
जप्त केलेल्या मुद्देमालाची माहिती
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 30,000 रुपये किमतीचा एक लोखंडी ड्रम आणि दोन प्लास्टिक ड्रम जप्त केले आहेत. या ड्रममध्ये 300 लिटर गावठी दारू बनवण्यासाठी तयार केलेले मिश्रण होते, ज्याची किंमत 100 रुपये प्रति लिटर अशी अंदाजित करण्यात आली आहे.
पुढील तपास सुरू
सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ पी. एन. सिनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. फरार झालेला आरोपीत मामुर तडवी याचा शोध पारध पोलीस सध्या घेत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक वाढला असून, अशा समाजविघातक कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहेत.