खरपुडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
By तेजराव दांडगे

खरपुडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
जालना, १४ जुलै २०२५: जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (L.C.B.) विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धडक कारवाई करत खरपुडी रोड परिसरातून एका व्यक्तीला गावठी पिस्तूलसह अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांचा शोध सुरू असताना, अशोक भानुदास भोसले (रा. गोकुळवाडी, ता. जि. जालना) हा खरपुडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी चाळगे मेगासिटी प्रवेशद्वार, खरपुडी रोड, जालना परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
अशोक भोसलेकडून ४१,२००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीतांविरुद्ध राजेंद्र छगनराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ आणि स्थागुशाचे अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, किशोर पुंगळे, अशोक जाधवर यांनी पार पाडली.
जालना पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.