जालन्यात ‘ऑपरेशन क्लीन’ यशस्वी: शाळा-महाविद्यालयांजवळ तंबाखू आणि अंमली पदार्थांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
By तेजराव दांडगे

जालन्यात ‘ऑपरेशन क्लीन’ यशस्वी: शाळा-महाविद्यालयांजवळ तंबाखू आणि अंमली पदार्थांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
जालना, दि. १२ :- जालना जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांच्या विशेष आदेशानुसार जालना पोलिसांनी एक धडक मोहीम राबवली. दिनांक 10 आणि 11 जुलै 2025 रोजी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, ई-सिगारेट आणि इतर अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनावर कठोर कारवाई करण्यात आली.
या ‘ऑपरेशन क्लीन’ अंतर्गत, जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी कंबर कसली. आष्टी पोलीस ठाण्याने 9, टेंभुर्णीने 15, परतूरने 4, तालुका जालनाने 14, भोकरदनने 7, चंदनझिराने 12, तीर्थपुरीने 6, मौजपुरीने 10, कदीम जालनाने 8, सदर बाजारने 9, हसनाबादने 18, सेवलीने 3, मंठाने 10, बदनापूरने 6, अंबडने 12, जाफराबादने 7, पारधने 8 आणि घनसावंगीने 4 अशा एकूण 162 केसेस दाखल केल्या. या कारवाईत तब्बल 32,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादने, पुरवठा व वितरण याचे विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली.
या धडक कारवाईमुळे तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारची मोहीम सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.