पारधच्या राजेंद्रजी श्रीवास्तव शाळेत रंगला विठूनामाचा गजर! चिमुकल्यांच्या दिंडीने जागवली परंपरा!
पारध दुमदुमले विठ्ठल गजरात: राजेंद्रजी श्रीवास्तव शाळेची 'ज्ञान दिंडी'

पारधच्या राजेंद्रजी श्रीवास्तव शाळेत रंगला विठूनामाचा गजर! चिमुकल्यांच्या दिंडीने जागवली परंपरा!
पारध, दि. ६ जुलै, २०२५: काल दि. ०५ रोजी भोकरदन तालुक्यातील पारध नगरी विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली! स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या महादिंडीचे आयोजन केले होते. पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत, शाळेच्या चिमुकल्यांनी उत्साहात पायी दिंडीत सहभाग घेतला आणि उपस्थितांची मने जिंकली.
या दिंडी सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून एक चैतन्यमय वातावरण निर्माण केले होते. विशेष म्हणजे, इयत्ता सातवीची विद्यार्थिनी प्राची लोखंडे हिने विठूमाऊलीचा वेष धारण केला होता, तर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सिद्धी भुते देवी रखुमाईच्या वेशभूषेत अत्यंत मनमोहक दिसत होती.
या आनंदमय सोहळ्यात गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ, संस्थेचे अध्यक्ष मनीष श्रीवास्तव, सरपंच सौ शारदाबाई काकफळे, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव, शाळेचे मुख्याध्यापक लक्कस सर, रवी तबडे सर आणि सर्व सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात आणि विठूनामाच्या जयघोषात झाली. आभार प्रदर्शनावेळी संस्थेचे अध्यक्ष मनीष श्रीवास्तव यांनी विठूमाऊली चरणी प्रार्थना केली. त्यांनी भरपूर पर्जन्यवृष्टी होऊन बळीराजा समृद्ध होवो आणि विद्यार्थी वर्ग ज्ञानसंपन्न होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या अनोख्या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहितीच झाली नाही, तर त्यांच्यात धार्मिक आणि सामाजिक मूल्यांची रुजवातही झाली, हे निश्चित!