जालना: ‘शिक्षण’ की ‘शिकस्ती’? पारध जिल्हा परिषद शाळेची दैना
By तेजराव दांडगे

जालना: ‘शिक्षण’ की ‘शिकस्ती’? पारध जिल्हा परिषद शाळेची दैना
पारध, दि. 26: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. काल रात्रीच्या पहिल्याच पावसानं शाळेचं प्रांगण अक्षरशः तलावात रूपांतरित झालं आहे. आणि गंमत म्हणजे, या नवनिर्मित तलावात बेडकांनी ‘डराव डराव’ भजनाचा अखंड जागर सुरू केला आहे, ज्याचा लाईव्ह अनुभव वर्गात बसलेली चिमुकली विद्यार्थी घेत असल्याचं चित्र आहे.
पोषण आहाराचं ‘ओलं’ वास्तव!
एकिकडे शाळेच्या आवारात पाण्याचा डोह साचला असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी ‘गरमागरम’ शालेय पोषण आहार जिथे बनवला जातो, त्या किचनची अवस्था तर त्याहून भयंकर आहे. छतावरील चार-पाच पत्रे पूर्णपणे निकामी झाले असून, तीन-चार फुटांचे तुकडे पडले आहेत. रात्रीच्या पावसानं संपूर्ण खोली पाण्यानं भिजून गेली आहे. ‘अशा परिस्थितीत पोरांसाठी जेवण बनवणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखंच आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीने शाळेला कंपाउंड करून मुरूम टाकला खरा, पण शाळेचा परिसर सखल असल्यामुळे आणि पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने, पहिल्याच पावसात ही ‘जलक्रीडा’ समोर आली आहे. शाळेसमोरील रस्त्याचीही दैना उडाल्याने, पारध जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न आता ‘मथळ्यावर’ नाही तर थेट ‘ऐरणीवर’ आला आहे.
सरकारचा उद्देश सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा आहे. पण जर शाळेचीच अशी अवस्था असेल, तर ‘प्रगती’ करायची कशी, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
दिला आंदोलनाचा इशारा
या गंभीर स्थितीवर येत्या चार-पाच दिवसांत तोडगा काढला नाही आणि शाळेतील साचलेले पाणी व पोषण आहार कक्षाची दुरवस्था तात्काळ दूर न केल्यास, सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी थेट शाळेतच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता वरिष्ठ अधिकारी आणि गावचे राजकीय धुरंधर एकत्र येऊन या ‘जलबंबाळ’ समस्येवर काय तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.