जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारध बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योगमय’ उत्साहाचे वातावरण!
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारध बु येथे योगमय वातावरण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारध बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योगमय’ उत्साहाचे वातावरण!
पारध, दि. 21 : आज, २१ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारध बु येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माजी केंद्रप्रमुख आणि आदर्श राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले आणि विविध योगासने व प्राणायाम करून दाखवले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला. ‘करा योग, रहा निरोग’ हे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनासाठी प्रेरित केले.
भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी शाळेतील तसेच उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त हातापायाचे सूक्ष्म व्यायाम तसेच प्राणायाम शिकवण्यात आले. निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, यावर समाधान लोखंडे यांनी भर दिला. ते म्हणाले की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम, प्राणायाम आणि योगासने यांची नितांत गरज आहे. यामुळे केवळ शरीर निरोगी आणि सुदृढ होते असे नाही, तर बुद्धीही तल्लख होते आणि अभ्यासातही त्याचा फायदा होतो. म्हणूनच, प्राणायाम आणि योगासने दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मुख्याध्यापक अजहर पठाण, पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. सोनुने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. अल्हाट, श्री. गावंडे, श्री. लक्कस, श्री. इवरकर, श्री. सावळे, श्री. जाकीर, श्री. सदाकत, कुटुंबरे मॅडम, जाधव मॅडम, तडवी मॅडम आदींनी परिश्रम घेतले.