अंधश्रद्धेचा पर्दाफाश: एकाचे कोटी करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; जादूटोणा करणाऱ्यास जालना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
By तेजराव दांडगे

अंधश्रद्धेचा पर्दाफाश: एकाचे कोटी करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; जादूटोणा करणाऱ्यास जालना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
जालना, दि. 18 : एकास एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास जालना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची पिळवणूक करणाऱ्यांवर चाप बसला आहे.
दिनांक १६/०६/२०२५ रोजी किशोर पंडीत शेवाळे (वय ४८, रा. पेरेजपूर, ता. साक्री, जि. धुळे) यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, रतन आसाराम लांडगे नावाच्या व्यक्तीने त्यांना १ लाखाचे १ कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून शेवाळे यांनी ३ लाख रुपये, तर त्यांच्या पुतण्याने २ लाख ५० हजार रुपये लांडगे याला दिले. लांडगे याने त्याच्या राहत्या घरी शेवाळे यांच्यासमोर जादूटोण्याचे प्रयोग करून दाखवत त्यांची एकूण ५,५०,०००/- रुपयांची फसवणूक केली. या तक्रारीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीत रतन आसाराम लांडगे (वय ४५, रा. भक्तेश्वर नगर, जालना) याच्या राहत्या घराची दोन शासकीय पंचसमक्ष झडती घेतली. यावेळी आरोपी लांडगे याच्यासोबत पदमनाभ जयप्रकाश राणे (वय ४१, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई), विकास वसंत अनभवने (वय ४१, रा. भांडूप पश्चिम, मुंबई) आणि नारायण गजानन जोशी (वय ५२, रा. विरार पश्चिम, मुंबई) हे तिघेही मिळून आले. या तिघांनाही लांडगे याने १ लाखाचे ३ कोटी करून देण्याचे आमिष दाखवले होते आणि ते प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन आले होते.
लांडगे याच्या घरातून धक्कादायक वस्तू जप्त:
पोलिसांनी लांडगे याच्या घराची झडती घेतली असता, तेथे अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्यामध्ये:
१. एक लोखंडी जाडीचा पिंजरा
२. एक लाकडी वीणा
३. पितळेची मोठी समयी
४. एक काळ्या रंगाच्या भालूचा मास्क
५. वाघाचे चित्र असलेला एक चामड्याचा मॅट
६. मानवी कवटीच्या आकाराची प्लास्टिकची छडी
७. प्लास्टिकची मानवी कवटी, दोन पाय, दोन हात आणि पाच बोटांचा प्लास्टिकचा पंजा
८. स्टीलचा हदळ, कुंकवाचा पंचपाळ
९. चार नारळ
१०. हदळ आणि कुंकवाची प्रत्येकी एक पुडी
११. एक स्टीलचा तांब्या व एक लहान स्टीलचा ग्लास
१२. काळ्या रंगाची कपड्याची बाहुली
१३. घोड्याचे चिन्ह असलेली अंखड मुठ असलेला एक स्टीलचा कोयता
१४. भगव्या रंगाचा ‘महाकाल’ लिहिलेला कुर्ता
१५. लाकडी मुठ असलेला एक चाकू
१६. लाल रंगाचे कापड
१७. ‘महाकाल’ असे लिहिलेला भगव्या रंगाचा रुमाल
१८. १०८ तुळशीमणी असलेली माळ
१९. ८०००/- रुपये किमतीच्या नोटांच्या आकाराचे कोरे कागदांचे तीन पांढऱ्या गोण्यांमधील बंडल, त्यापैकी एका गोणीत सोळा बंडलवर प्रत्येकी ५०० रुपयांची नोट लावलेली होती.
सदर आरोपीतास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला दिनांक १७/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली. आरोपीताकडून १,४९,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
अजयकुमार बन्सल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक, जालना), अनंत कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना) यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष सबाळे (पोलीस निरीक्षक), अतुल पाटील (सहायक पोलीस निरीक्षक), पो.ह. २५० गाडेकर, पोकॉ १५११ शेंडीवाले, पोकॉ १५६५ माळी, पोकॉ १४६२ काळे, मपोकॉ १२२४ जाधव (सर्व नेमणूक पो.स्टे. तालुका जालना) यांनी ही कारवाई केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील हे करीत आहेत. या कारवाईमुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या समाजकंटकांना जरब बसेल अशी अपेक्षा आहे.