रावसाहेब दानवेंची पारधमधून ‘राजकारण सोडा, समाजकारण करा’ हाक: दिव्यांगांना मदतीचा हात, पालकांना कानमंत्र!
By तेजराव दांडगे

रावसाहेब दानवेंची पारधमधून ‘राजकारण सोडा, समाजकारण करा’ हाक: दिव्यांगांना मदतीचा हात, पालकांना कानमंत्र!
पारध बु., १५ जून: माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील पारध बु. येथे आयोजित दिव्यांग बांधवांसाठीच्या कृत्रिम अवयव वाटप शिबिरात “राजकारण सोडा, समाजकारण करा!” अशी स्पष्ट भूमिका मांडत सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. निवडणुका संपल्यानंतर पक्षभेद विसरून समाजोपयोगी कामांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले. “गरीब दिव्यांग बांधवांना मदत करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे,” असं दानवेंनी आवर्जून सांगितलं.
‘सरकार योजना राबवतंय, पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत!’
श्री दानवे यांनी मान्य केलं की, सरकार दिव्यांगांची काळजी घेतं, पण सरकारी योजना अजूनही गावांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी योग्य नेतृत्वाची कमतरता आणि शिक्षणाचा अभाव ही मुख्य कारणं असल्याचं त्यांनी म्हटलं. पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. “मुलगा शाळेत गेला का? कोणता पाठ शिकवला? शिक्षक चांगले शिकवतात का? शाळेत जाऊन चौकशी करावी,” असं आवाहन त्यांनी केलं.
पारध बु. मध्ये २६८ दिव्यांगांना आधार
स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त पारध बु. येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव महाविद्यालय व इंग्लिश स्कूलमध्ये भव्य मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. स्व. हरिवंशराय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पारध, लालबहादूर शास्त्री सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडलं.
या शिबिरात २६८ दिव्यांग बांधवांच्या हात व पायांची मोजमापं घेण्यात आली असून, लवकरच त्यांना मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) दिले जाणार आहेत, अशी माहिती आयोजक माजी जि.प. सभापती मनीष श्रीवास्तव यांनी दिली. प्रकल्प प्रमुख मिलिंद जाधव व डॉ. सलील जैन यांनी मोजमापे घेण्याचं काम केलं.
यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, डॉ. जीवन राजपूत, डॉ. सी.आर. तांदुळजे यांनीही मार्गदर्शन केलं. राजेंद्र देशमुख, त्र्यंबक पाबळे, सरपंच शारदाबाई काकफळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी जि. प. सभापती मनीष श्रीवास्तव यांनी केलं.
श्री दानवे यांनी भविष्यात अशाप्रकारची शिबिरं तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचं आवाहन केलं. केंद्र सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात मोफत मदत करतं, मात्र यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. निवडणुका संपल्यावर राजकारण बाजूला ठेवून समाजकार्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी पुनरुच्चारित केलं.