गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
जालना, दि. 11: गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर जालना पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (११ जून २०२५) गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंधारी शिवारात केलेल्या अचानक छाप्यात ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन ट्रॅक्टर आणि केनीसह वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिल्या होत्या. यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले.
पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंधारी शिवारात गोदावरी नदीपात्रात काहीजण ट्रॅक्टर आणि केनीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करत आहेत. या माहितीच्या आधारे, पथकाने तात्काळ कारवाई करत गंधारी शिवारात छापा टाकला.
या छाप्यात गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करताना दोन ट्रॅक्टर आणि केनीसह ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि स्थागुशाचे अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, बाबासाहेब डमाळे, सतीश श्रीवास, कैलास चेके, आर. व्ही. केंद्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.