जाफराबाद आगारातून १३ नव्या “लालपरी” बससेवा सुरू: आमदार दानवेंनी घेतला सामान्य प्रवाशांचा अनुभव!
By तेजराव दांडगे

जाफराबाद आगारातून १३ नव्या “लालपरी” बससेवा सुरू: आमदार दानवेंनी घेतला सामान्य प्रवाशांचा अनुभव!
जालना, दि. ७ जून (प्रतिनिधी): जाफराबाद आगारातून आजपासून १३ नव्या एस.टी. बससेवांचा शानदार लोकार्पण सोहळा पार पडला. पंचायती राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते या बसगाड्यांना हिरवी झेंडी दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, आमदार दानवे यांनी केवळ रिबन कापण्यापुरते मर्यादित न राहता, सामान्य प्रवाशांप्रमाणे स्वतः बसमधून प्रवास करत अनोखा आदर्श घालून दिला.
या १३ नव्या बसपैकी ८ बस मानव विकास मिशन अंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित ५ “लालपरी” बस सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. या सोहळ्याला जाफराबादचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, एस.टी. आगारप्रमुख, तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संतोष पाटील दानवे यांनी या बससेवेचे लोकार्पण करताना केवळ औपचारिकता न पाळता, जाफराबाद ते टेंभुर्णी दरम्यान लालपरी बसमधून प्रवास केला. त्यांनी कंडक्टरकडून तिकीटही काढले आणि कार्यकर्त्यांसह बसमधील प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधला. एका लोकप्रतिनिधीने सर्वसामान्यांमध्ये मिसळून केलेला हा प्रवास पाहून उपस्थितांमध्ये आणि प्रवाशांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
तीन वेळा आमदार राहिलेले आणि प्रथितयश नेते रावसाहेब पाटील दानवे यांचे सुपुत्र असूनही, आमदार संतोष पाटील दानवे यांनी दाखवलेला हा साधेपणा आणि आपलेपणा विशेष कौतुकास्पद ठरला. “नेतेपणाच्या आभाळात झेपावलेला नेता, पण पाय जमिनीवर!” या दृश्याने बसमधील प्रवाशांच्या चेहऱ्यावर कौतुक, प्रेम आणि आपलेपणाची भावना स्पष्टपणे दिसून आली. राजकारणात माणुसकीचा स्पर्श काय असतो, याचे हे एक उत्तम आणि जगजाहीर उदाहरण ठरले. जनतेच्या सोयीसाठी नव्या बससेवा सुरू करण्याबरोबरच, एका लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष प्रवास करून आपलेपणाचा दाखला दिल्याने या उपक्रमाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.