अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला जालना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
By तेजराव दांडगे

अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला जालना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
जालना, दि. 08: जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, एका तरुण तस्कराला तब्बल ₹92,600/- किमतीच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात आलं.
फिल्मी स्टाईलने पकडला आरोपी
दिनांक ७ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, राणीउंचेगाव ते गाढेसावरगावजवळ नंदिनी हॉटेलसमोर एक व्यक्ती इलेक्ट्रिक स्कुटीवरून अवैध दारूची वाहतूक करत आहे. माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. नंदिनी हॉटेलसमोर थांबून असताना, एका लाल रंगाच्या ओकिनावा कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटीवरून एक तरुण तिथे आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने आपलं नाव लक्ष्मण सुरेश लांडगे (वय १९, रा. इंदेवाडी, ता. जि. जालना) असल्याचं सांगितलं. पंचांसमोर त्याच्या स्कुटीची झडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. त्याच्या स्कुटीत ₹92,600/- किमतीची देशी-विदेशी दारू आणि ती दारू वाहून नेण्यासाठी वापरलेली स्कुटी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून लक्ष्मण लांडगे याला ताब्यात घेतलं.
सदरची कारवाई सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, देविदास भोजने, सागर बावस्कर, भागवत खरात आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे. अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जालना पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद असून, यामुळे जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल.
तुमच्या परिसरातही अशी कोणती अवैध दारू विक्री किंवा वाहतूक होत असल्यास, तात्काळ पोलिसांना कळवा. तुमच्या एका माहितीमुळे अनेक गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते!