मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात (CMEGP) महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर
By तेजराव दांडगे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात (CMEGP) महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर
जालना, दि. २३ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेत अनेक सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना उद्योजक बनण्याची अधिक चांगली संधी मिळणार आहे. उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील नवीन संधी आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे.
योजनेतील प्रमुख सुधारणा:
• प्रकल्पांची कमाल मर्यादा वाढवली:
• उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी: आता ₹११ कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध.
• सेवा आणि कृषीपूरक व्यवसायांसाठी: आता ₹५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध.
• खेळत्या भांडवलाची मर्यादा वाढवली:
• सेवा उद्योगांसाठी: प्रकल्प खर्चाच्या ६०% पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी.
• उत्पादन उद्योगांसाठी: प्रकल्प खर्चाच्या ४०% पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी.
• नवीन व्यवसायांचा समावेश: कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल ढाबा (शाकाहारी/मांसाहारी), होम-स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय यांसारख्या व्यवसायांना आता या योजनेतून लाभ घेता येईल.
• शैक्षणिक पात्रतेत शिथिलता:
• ₹१० लाखांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी आणि ₹५ लाखांवरील सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी आता केवळ आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• वयोमर्यादेचे बंधन नाही: या योजनेसाठी आता वयाची कोणतीही मर्यादा नाही. १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही स्थानिक रहिवाशाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• प्रशिक्षण निवडीची मुभा: लाभार्थी आता निवासी किंवा ऑनलाईन उद्योजकीय प्रशिक्षणाची निवड करू शकतात.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी आवाहन केले आहे की, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या १,३०० प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी तरुणांनी योजनेच्या www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज भरावे. तसेच, जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावांना त्वरित मंजुरी देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.