जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: कौशल्य विकास केंद्राने राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद: कौशल्य विकास केंद्राने राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय ‘कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम’ अंतर्गत जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या मूल्यमापनात जालना कार्यालयाच्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेण्यात आली.
१०० दिवसीय मोहिमेतील यश
या मोहिमेअंतर्गत जालना जिल्हा कार्यालयाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या १० कलमी महत्त्वाकांक्षी कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली, ज्यात खालील प्रमुख बाबींचा समावेश होता:
संकेतस्थळाचा विकास आणि अद्ययावत माहिती: नागरिकांसाठी अद्ययावत माहिती सहज उपलब्ध करून देण्यात आली.
नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी उपाययोजना: जनतेला सेवा मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्वच्छता व कार्यालयीन परिसराचे व्यवस्थापन: स्वच्छ आणि सुव्यवस्थित कार्यालयीन वातावरण राखले.
जनतेच्या तक्रारींचे वेळेवर व प्रभावी निराकरण: तक्रारींची नोंद घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही केली.
कार्यालयातील सुविधा व सोयींचा स्तर उंचावणे: नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसार व प्रोत्साहन: उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी व आढावा: कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात आला.
ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी: प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक बनवले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण: कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले.
विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी: नवनवीन कल्पना आणि योजना राबवून सेवा सुधारल्या.
या सर्व घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच जालना जिल्हा कार्यालयाने राज्यस्तरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मार्गदर्शक आणि सहकारी
या यशामागे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा, नितीन पाटील (आयुक्त, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, मुंबई), जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उप आयुक्त, आयुक्तालय मुंबई, आणि डी.डी.पवार (उप आयुक्त, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विद्या शितोळे) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या नेतृत्वाखाली भुजंग रिठे, सुरेश बहुरे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदिप डोळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, सुभाष पंडीत, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, सोमेश्वर शिंदे, निर्मल बिडकर, दिपक पालवे, अमर तुपे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य या यशात महत्त्वाचे ठरले.
जालना जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून, या केंद्राने इतर कार्यालयांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.