‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम: विद्यार्थ्यांना वेळेत मिळणार विविध प्रमाणपत्रे
By तेजराव दांडगे

‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम: विद्यार्थ्यांना वेळेत मिळणार विविध प्रमाणपत्रे
जालना, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यात ‘दाखला आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणारी संभाव्य गर्दी टाळता येईल.
उपजिल्हाधिकारी सा. प्र. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे की, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वय, अधिवास व रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन-क्रिमिलेअर), तसेच रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यास मदत होईल.
जालना जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २६ ते २७ मे, २०२५ या कालावधीत ‘दाखला आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू झाल्यावर होणारी धावपळ आणि गर्दी टाळून, वेळेत प्रमाणपत्रे मिळवता येतील.