गोंदी पोलिसांची मोठी कारवाई: गांजा शेतीवर धाड, 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

गोंदी पोलिसांची मोठी कारवाई: गांजा शेतीवर धाड, 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
जालना (गोंदी), दि. 19: गोंदी पोलिसांनी गांजा लागवड आणि विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दिनांक 17 मे 2025 रोजी सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल शाकेरोद्दीन सिद्दीकी हे गस्त घालत असताना त्यांना एका विना नंबरची मोटारसायकल संशयास्पद अवस्थेत आढळून आली. या मोटारसायकलच्या अनुषंगाने चौकशी केली असता, ती अशोक गाडेकर यांनी गोंदी तांडा येथील सराईत गुन्हेगार प्रभाकर गंगाराम पवार याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, पोलीस नाईक चरणसिंग बमनावत आणि पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी यांनी गोंदी तांडा येथे जाऊन प्रभाकर पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी प्रभाकर पवार आणि त्याचे नातेवाईक सुरेखा विलास शिंदे, सपना पवन शिंदे, लक्ष्मी महादेव पवार, कैलास राठोड, जया ऊर्फ रूपाली पवार आणि एका अनोळखी व्यक्तीने जमाव जमवून पोलिसांवर हल्ला चढवला. प्रभाकर पवार याने पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला, जो त्यांच्या हातावर लागला. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक नागरगोजे जखमी झाले, तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण हावले यांच्या खाजगी गाडी क्रमांक MH25BA 2226 ची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते गांजा लागवड आणि विक्रीचा व्यवसाय करत होते आणि पोलिसांना गांजा मिळू नये म्हणून त्यांनी हल्ला केला होता. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी आरोपीतांच्या घरी छापा टाकला. या छाप्यामध्ये गांज्याची झाडे आढळून आली आणि पोलिसांनी गंगाराम सावळा पवार याला अटक केली. पोलिसांनी एकूण 14 किलो गांजा जप्त केला, ज्याची किंमत 3,64,800 रुपये आहे.
तपासात आरोपीत गंगाराम सावळा पवार, वकिल्या ऊर्फ विलास बाबूराव शिंदे, प्रभाकर गंगाराम पवार, सुरेखा विलास शिंदे, सपना पवन शिंदे, लक्ष्मी महादेव पवार, कैलास राठोड, जया ऊर्फ रूपाली प्रभाकर पवार आणि त्यांचे इतर नातेवाईक मिळून त्यांच्या राहत्या घराजवळ गांजा पिकवून त्याची जिल्ह्यात आणि परजिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मिळवून सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर अधिक तपास करत आहेत.
आरोपीत गांजा विक्रीसाठी वापरत असलेले एक स्कॉर्पिओ वाहन आणि दोन दुचाकी वाहने, अंदाजे 7,00,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गोंदी पोलीस स्टेशनची चार पथके कार्यरत आहेत. या आरोपींवर राज्यात आणि परराज्यात चोरी, पाकीटमारी, घरफोडी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल साहेब, अपर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोलीस उप निरीक्षक बालाजी पदमणे, सपोफौ ज्ञ शानेश्वर कंटूले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, संतोष डोईफोडे, पोलीस नाईक चरणसिंग बमनावत, पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप हवाले, दिपक भोजणे, शाकिरोद्दीन सिद्दीकी, पोकों बाळासाहेब मंडलिक, सुरेश राठोड, अंकूश पठाडे, नवनाथ राउत, सचिन साळवे, पोहेकों गणेश मुंढे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मुसळे आणि गोंदी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर करत आहेत.