मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे यंत्रणांना निर्देश
By तेजराव दांडगे

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे यंत्रणांना निर्देश
जालना, दि. १५ : आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करून मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडीक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करावे. मान्सूनपूर्व काळात यंत्रणांनी सतर्क राहावे आणि अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुठेही अशी घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचेल अशा पद्धतीने नियोजन करावे. घटनेचा पंचनामा तातडीने करून त्याचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर करावा, जेणेकरून वेळेत आर्थिक मदत देणे शक्य होईल. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा व नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. मान्सून काळात जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आपत्तीच्या कामात निष्काळजीपणा करू नये. यात दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डॉ. पांचाळ यांनी सर्व यंत्रणा आणि नागरिकांना ‘दामिनी’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभागप्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी आपले अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पांची तातडीने दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा आणि धान्य पुरवठा करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, केळणा, पूर्णा, गिरजा यांसह इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता गावांना पुराचा धोका उद्भवू शकतो. यासाठी नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी पुररेषा आखणीचे काम तातडीने करावे. जिल्ह्यात संभाव्य पूरप्रवण ४७ गावे आहेत. पूरपरिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याची जनजागृती करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या आवश्यक साहित्याची तपासणी करून घ्यावी. २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करून कक्षातील संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत. तसेच तालुका स्तरावर देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करावेत. नगरपालिका, अग्निशमन दल, पंचायत समिती, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग, वाहतूक विभाग आदी संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना सर्वांना तात्काळ पोहोचतील याचे नियोजन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. २० मे, २०२५ पूर्वी सादर करावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मदतीसाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा आवश्यक त्या साधनांनी अद्ययावत असल्याची खातरजमा करावी. पावसाळ्यातील संभाव्य साथीचे व जलजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगांना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी व रक्तसाठा उपलब्ध ठेवावा. आरोग्याच्या सुविधा नागरिकांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. नदी काठावरील गावात बचाव पथक, यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, लाईफ बोयाज आणि पोहणाऱ्या व्यक्तींची यादीसह इतर साधनसामग्रीची उपलब्धता व सुस्थिती तपासून ठेवावी. पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा व मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी पालिका व तहसील विभागाने सुरक्षित स्थळांची निवड करून त्याचे नियोजन आतापासूनच करावे.
वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने पूर्व नियोजन करावे. नागरी भागातील नाल्यांची स्वच्छता करावी. तसेच नागरी व ग्रामीण भागातील धोकादायक इमारती व घरांची पाहणी करून संबंधितांना पूर्वसूचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिले.
प्रारंभी मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी कोणत्याही आपत्तीत जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ आणि कार्यालयाचा ०२४८२-२२३१३२ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पूरस्थितीबाबत पूर्वसूचना, मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प, संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणारी गावे, तसेच पाण्याचा विसर्ग याबाबतही आढावा घेण्यात आला.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, महावितरण, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, बीएसएनएल आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.