
जेईई परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
जालना, दि. १६: आगामी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) आणि (Advanced) परीक्षा – 2025 रविवार, दिनांक १८ मे 2025 रोजी जिल्ह्यातील जे.ई.एस. महाविद्यालय आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.
अप्पर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडीक यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिघात शांतता भंग होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा कोणत्याही कृत्यास मनाई करण्यात आली आहे.
हे प्रतिबंधात्मक आदेश रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत अंमलात राहतील. परीक्षा सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.