भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधरांसाठी अधिकारी होण्याची संधी
By तेजराव दांडगे

भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधरांसाठी अधिकारी होण्याची संधी
जालना, दि. 16: अभियांत्रिकी पदवीधर तरुणांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याची मोठी संधी चालून आली आहे. भारतीय सैन्याने तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) सुरू केला असून, यासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.
या भरती प्रक्रियेत केवळ अविवाहित पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतील. अर्जदारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी (बी.ई.) किंवा बी.टेकची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, जे उमेदवार अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच, ज्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी, 1999 ते 1 जानेवारी, 2006 दरम्यान झाला आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांची पदवी सैन्याच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमधीलच असावी, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 मे, 2025 आहे.
भरती प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती आणि तपशीलांसाठी, उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे. त्यामुळे, ज्या तरुणांना देशसेवेची आणि सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा आहे, त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.