समाजकार्य विद्यार्थ्यांची सखी-वन स्टॉप सेंटरला ज्ञानवर्धक भेट
By तेजराव दांडगे

समाजकार्य विद्यार्थ्यांची सखी-वन स्टॉप सेंटरला ज्ञानवर्धक भेट
पारध, दि. 13: येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालयाच्या एम.एस.डब्ल्यु. भाग १ च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच (दि. १३ मे २०२५) प्राचार्य आर.ए. कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि प्रा. एस.बी. वाघ यांच्या सक्रिय नेतृत्वामध्ये सखी-वन स्टॉप सेंटरला भेट देऊन सामाजिक कार्याचा महत्त्वपूर्ण अनुभव घेतला. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. एस.बी. वाघ यांनी भेटीच्या सुरुवातीला संस्थेचा परिचय करून दिला. त्यानंतर सखी-वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक आदरणीय आशा बोर्डे मॅडम यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना विविध उपक्रम, संस्थेची उद्दिष्ट्ये आणि धोरणे यावर प्रकाश टाकला. त्यांनी लाभार्थ्यांसाठी असलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबतच सेंटरमध्ये मिळणाऱ्या मोफत सुविधांची सखोल माहिती दिली.
एकाच छताखाली तात्पुरता निवारा, वैद्यकीय मदत, पोलीस सुविधा, कायदेशीर मार्गदर्शन, तातडीची मदत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. तसेच, त्यांनी मनोसामाजिक समुपदेशनाचे महत्त्व आणि गरज यावर आपले विचार व्यक्त केले.
ॲड. अंजना घोंगडे यांनी संकटग्रस्त महिलांना २४ तास मिळणारी मोफत मदत, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि बलात्कार तसेच इतर अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना मिळणारे सहाय्य आणि उपचारांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेत कार्यरत असलेल्या ज्योती जाधव यांनी संकटग्रस्त महिलांसोबत काम करतानाचे आपले अनुभव कथन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्याची प्रत्यक्ष जाणीव झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी संतोष नारायण गवई यांनी आभार मानले. स्व. हरिवंश राय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव विक्रांत श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालयात एम.एस.डब्ल्यु. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन व्यावसायिक दृष्ट्या सक्षम समुपदेशक बनण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान एम.एस.डब्ल्यु. भाग १ चे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.