मुंबईत संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात उच्चस्तरीय समन्वय बैठक
High-level coordination meeting between Defence Forces and State Government in Mumbai

मुंबईत संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात उच्चस्तरीय समन्वय बैठक
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी राज्य सरकार आणि संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक पार पडली. या बैठकीत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आवश्यक सुरक्षा उपायांवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदुर’च्या अचूक आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक केले आणि त्याला ‘अभूतपूर्व’ म्हटले. त्यांनी संरक्षण दलाला सलाम केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आर्थिक पायाभूत सुविधांवर थेट परिणाम केला आहे. त्यामुळे, अशा संवेदनशील ठिकाणी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.”
राज्य सरकार आणि संरक्षण दलातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी, एका स्वतंत्र यंत्रणेची स्थापना करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि कर्नल, नौदलाचे रिअर ॲडमिरल आणि कमांडर, हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल, राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृह व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस आणि होमगार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.