यशाचा खरा अर्थ: प्रामाणिक प्रयत्नांची किंमत की कॉपीच्या मार्गाची फसवणूक?
रोखठोक : टक्केवारीचा फुगवटा की प्रामाणिक यशाचा झेंडा?

यशाचा खरा अर्थ: प्रामाणिक प्रयत्नांची किंमत की कॉपीच्या मार्गाची फसवणूक?
दि. 5 मे रोजी बारावीचा निकाल आला आणि नेहमीप्रमाणे आनंदाचं वातावरण पसरलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकालात कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के उत्तीर्णतेची नोंद करत अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर कोल्हापूर विभागात ९३.६४ टक्के आणि मुंबई विभागात ९२.९३ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले. उर्वरित छत्रपती संभाजीनगर (९२.२४%), अमरावती (९१.४३%), पुणे (९१.३२%), नाशिक (९१.३१%), नागपूर (९०.५२%) आणि लातूर विभागात ८९.४६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
D9 न्यूज या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतं! ज्यांना अपयश आलं, त्यांनी नाउमेद होऊ नये. संधी अजूनही आहेत आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
पण या सगळ्या उत्साहात एक महत्त्वाचा प्रश्न मनात घर करून राहतो – हे जे यश मिळालंय, त्यात किती जणांनी खरंच आपली ताकद लावली? किती जणांनी वर्षभर पुस्तकांशी गट्टी जमवून घाम गाळला? आणि किती जणांनी शॉर्टकट मारला, म्हणजे कॉपीच्या जीवावर बाजी मारली?
ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ते खरंच इतरांसाठी प्रेरणास्रोत आहेत. पण दुसरीकडे, परीक्षा हॉलमध्ये दुसऱ्यांच्या उत्तरांची चोरी करून पास होणाऱ्यांचाही सत्कार होतो, हे कुठेतरी खटकतं.
हा नुसता निकालाचा विषय नाहीये, तर आपल्या शिक्षण पद्धतीचा आणि समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे. ज्या शाळा-कॉलेजांमध्ये कॉपीसारख्या गोष्टींना कानाडोळा केला जातो किंवा नकळत प्रोत्साहन मिळतं, तिथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुळावरच घाव बसतो. यावर पालक आणि शिक्षकांनी गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्या मुलांनी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता, आपल्या हिमतीवर जिंकावं, ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असायला हवी.
आज जे विद्यार्थी कॉपी करून मोठे गुण मिळवतील, ते उद्या डॉक्टर, इंजिनीअर, वकील किंवा मोठे अधिकारी बनल्यावर काय करतील? तिथेही त्यांच्या ज्ञानाची आणि नीतिमत्तेची परीक्षा होईल. गैरमार्गाने मिळवलेलं यश फार काळ टिकणार नाही, उलट ते समाजासाठी धोकादायक ठरू शकतं. याउलट, जे विद्यार्थी जीवाचं रान करून पास होतात, त्या प्रामाणिक आणि कष्टाळू पिढीवरच आपल्या समाजाचं भविष्य अवलंबून आहे.
खरं सांगायचं तर, ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, भले त्यांना थोडे कमी मार्क मिळाले असतील किंवा ते अगदी काठावर पास झाले असतील, तरी ते कॉपी करून फर्स्ट येणाऱ्यांपेक्षा जास्त आदराला पात्र आहेत. कारण त्यांनी आपल्या सचोटीचं आणि मेहनतीचं फळ मिळवलंय. कॉपी करणाऱ्यांचा गौरव करणं म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा अपमान आहे.
D9 न्यूजच्या माध्यमातून आमचा कटाक्ष याच गंभीर विषयावर आहे. शिक्षण संस्थांनी आता कठोर पाऊल उचलून कॉपीसारख्या गैरप्रकारांना पूर्णपणे थांबवायला हवं. ज्या विद्यार्थ्यांनी सचोटीने यश मिळवलंय, त्यांचं मनःपूर्वक कौतुक करायला हवं, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि इतरांनाही योग्य मार्ग दिसेल. कारण एका प्रामाणिक आणि मेहनती पिढीवरच आपल्या समाजाचं भविष्य सुरक्षित आहे. बारावीच्या निकालातील या प्रामाणिक आणि अप्रामाणिक यशाच्या गंभीर विचाराची हीच खरी वेळ आहे.
परीक्षा वेळेत विविध माध्यमातून लागलेल्या बातम्या