जालना पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत जप्त केला कोट्यवधींचा मुद्देमाल
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत जप्त केला कोट्यवधींचा मुद्देमाल
जालना, दि. ३०: पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वाखाली जालना पोलिसांनी १८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम चालवली. या मोहिमेत पोलिसांनी जोरदार कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या विशेष मोहिमेत अवैध दारूच्या सर्वाधिक २३५ गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांनी २२ लाख १६ हजार ६५७ रुपयांची दारू जप्त केली. यासोबतच, जुगाराच्या ५६ धाडींमध्ये २ लाख ४२ हजार ७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १९ जणांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल ६ कोटी ७९ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमली पदार्थांविरुद्ध केलेल्या ४ कारवायांमध्ये ८६ किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत २१ लाख ४५ हजार रुपये आहे. इतर कारवायांमध्ये, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ३ जणांना अटक करून ८१ हजार १०० रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली, तर गुटख्याच्या ३ धाडींमध्ये १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे, जालना पोलिसांनी या विशेष मोहिमेत एकूण ३१८ गुन्हे दाखल केले असून ८ कोटी ६५ लाख ५३ हजार ५०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. याव्यतिरिक्त, पोलिसांनी शहरातील २२२ वाहनांवर ब्लॅक फिल्म लावल्याबद्दल कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या यशस्वी कारवाईसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.