भोकरदन डिव्हिजनमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 94 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 गुन्हे दाखल!
By तेजराव दांडगे

भोकरदन डिव्हिजनमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 94 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 गुन्हे दाखल!
अपर पोलीस अधीक्षक, आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन डिव्हिजन मध्ये पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत हसनाबाद आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 94 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळूने भरलेले 3 हायवा ट्रक आणि अवैध वाळू उपसा करणारे 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. तर, टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे 2 हायवा ट्रक आणि 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत पोलिसांनी एकूण 5 हायवा ट्रक आणि 5 आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल 94 लाख 64 हजार रुपये आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांच्यासह पोलीस अंमलदार प्रताप सुंदरडे, निखिल गायकवाड, विशाल सोळुंखे, यश देशमुख आणि शिवा कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांनी सांगितले की, अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर पोलीस अधिक कठोर कारवाई करत राहतील. त्यांनी नागरिकांनाही अशा प्रकारच्या गैरकृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम आणि त्यांच्या टीमने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.