पारधसह परिसरात चोरी सत्र सुरूच; पारध पाठोपाठ आता मोहळाईतून बैलजोडी आणि गीर वासरी लंपास
By तेजराव दांडगे

पारधसह परिसरात चोरी सत्र सुरूच; पारध पाठोपाठ आता मोहळाईतून बैलजोडी आणि गीर वासरी लंपास
पारध, दि. 29: भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे बैलजोडी चोरीची घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुसऱ्याच दिवशी मोहळाई गावातून जनावरे चोरून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. मोहळाई येथील शेतकरी देवाजी देविदास पालकर यांची बैलजोडी, तर भीका शरद पालकर यांची एक गीर वासरी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
एकापाठोपाठ घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पारध पोलिसांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून चोरांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पारध पोलिसांनी यापूर्वीच्या चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असतानाच, आता मोहळाईतील या नवीन चोरीमुळे पोलिसांवरील दबाव वाढला आहे. चोरट्यांनी एकामागे एक चोऱ्या करून पोलिसांना अक्षरशः आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता पारध पोलीस या चोरांना कोणत्या पद्धतीने पकडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या घटनांमुळे परिसरातील शेतकरी अधिक सतर्क झाले असून, आपल्या जनावरांची सुरक्षा वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक करत आहेत.