जिद्द आणि परिश्रमातून गवसले यश! महालक्ष्मी पतसंस्थेत नितीन बोडखे यांचा भव्य सत्कार
By तेजराव दांडगे

जिद्द आणि परिश्रमातून गवसले यश! महालक्ष्मी पतसंस्थेत नितीन बोडखे यांचा भव्य सत्कार
वालसावंगी, दि. 26: येथील सुपुत्र नितीन बोडखे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशात 677 वा क्रमांक मिळवून आपल्या गावाचा नावलौकिक केला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आज महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत एका शानदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्थेचे खजिनदार आदरणीय दादाराव तुपकर साहेब यांनी नितीन बोडखे यांचा यथोचित सन्मान केला.
नितीन बोडखे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार न मानता अथक परिश्रम घेतले आणि आज हे राष्ट्रीय स्तरावरील यश संपादन केले आहे. लहान वयात पित्याचे छत्र हरपलेल्या नितीन यांच्या आईने भाजीपाला विक्री करून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या त्यागामुळेच नितीनला योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली. एका सामान्य कुटुंबातील विधवा महिलेच्या मुलाने देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या परीक्षेत मिळवलेले यश हे निश्चितच प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे. याच भावनेतून महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने या युवा प्रतिभावानाचा सत्कार आयोजित केला होता.
सत्कार समारंभात नितीन बोडखे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, आकर्षक पुष्पहार, सुंदर पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादाराव तुपकर, पालक संचालक शरद खोत, शाखाव्यवस्थापक विशाल अस्वार, सल्लागार राजू भुते, अनिल जोडपे, हरिभाऊ बेराड, नामदेव लोखंडे, रमेश सुरडकर, दीपक तायडे, राजेंद्र उदरभरे, सोमनाथ घोडतुरे, अक्षय पायघन, पवन गावंडे, किशोर डोंगरे, राजेश शेळके, वैभव अस्वार, सुधाकर उदरभरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. सर्वांनी नितीन बोडखे यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.