लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढील हप्ता लवकरच जमा होणार, मात्र नियमांमध्ये बदल
Good news for dear sisters! The next installment will be deposited soon, but there are changes in the rules

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढील हप्ता लवकरच जमा होणार, मात्र नियमांमध्ये बदल
महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील म्हणजेच दहावा हप्ता येत्या 30 एप्रिल 2025 पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त असल्याने, या दिवशी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1500 रुपये मिळणार आहेत.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत, वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत नऊ हप्त्यांची यशस्वी वाटपणी झाली असून, पुढील हप्त्यासाठी लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता होती.
दरम्यान, योजनेच्या अर्जांची सध्या कसून तपासणी सुरु आहे. शासनाच्या नियमांनुसार, ज्या महिला अपात्र ठरतील, त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. विशेषतः ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे निदर्शनास आले होते की अनेक महिला ‘शेतकरी सन्मान निधी’ आणि ‘लाडकी बहीण योजना’ या दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या. सरकारच्या नियमानुसार, एका व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे, ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवळ 500 रुपयेच मिळणार आहेत. या नवीन नियमामुळे राज्यातील सुमारे 8 लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेचा उद्देश हा खरंच गरजू महिलांना आर्थिक मदत करणे आहे. त्यामुळे नियमांचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी सर्व पात्र लाभार्थी महिलांना 30 एप्रिलपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, याची खात्री दिली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा आधार मिळणार आहे, यात शंका नाही.