जालना जिल्ह्यातून 5 गुन्हेगार हद्दपार, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यातून 5 गुन्हेगार हद्दपार, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
जालना, दि. 16: जालना जिल्ह्यात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध वारंवार गुन्हे करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकरम ऊर्फ लाला जुम्मा खान (वय ३२, रा.तड्डुपुरा, जालना), मोहसीनखान हुसेन खान (वय ३५, रा. मोरंडी मोहल्ला, जुना जालना) आणि मोहंमद शोएब मोहंमद इद्रीस (वय ३२, रा. कसबा विठ्ठल मंदीर, जुना जालना) हे रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळी बनवून जिल्ह्यात वारंवार शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करत होते. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक बंसल यांनी यावर सुनावणी घेतली. सुनावणीअंती या तिघांनाही एक वर्षासाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. याचबरोबर, मंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्या मोहसीन ऊर्फ उडीद रहेमत कुरेशी (वय २८, रा. इंद्रानगर, मंठा) आणि अमोल प्रकाश दांडेकर (वय २५, रा. अशोक सम्राटनगर, मंठा) यांना देखील सहा महिन्यांसाठी जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर दादाहरी चौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.डी. निकाळजे यांच्यासह अंमलदार रुस्तुम जैवाळ आणि सचिन राऊत यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने उचललेले हे कठोर पाऊल असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.