पारध येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
By तेजराव दांडगे

पारध येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
पारध, दि. 14: भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत सर्वधर्मीय बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, परंतु या मिरवणुकीतील एक खास बाब म्हणजे मुस्लिम बांधवांनी दर्शवलेले सामाजिक सलोख्याचे उदाहरण. गावातील मस्जिदसमोरून जेव्हा मिरवणूक जात होती, तेव्हा मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे जयंतीमध्ये सहभागी झालेल्या सर्व बांधवांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती.

या उपक्रमामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांना मोठा आनंद झाला आणि त्यांनी मुस्लिम बांधवांच्या या सदिच्छापूर्ण कृतीचे कौतुक केले. यावेळी जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दोन्ही समुदायाच्या प्रमुख व्यक्तींनी एकत्र येत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

पारध बु मधील या मिरवणुकीने केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला नाही, तर हिंदू आणि मुस्लिम समुदायातील एकोपा आणि सलोखा किती दृढ आहे, हे देखील दाखवून दिले आहे.
यामुळे पारध परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र या सामाजिक सलोख्याच्या भावनेचे कौतुक होत आहे. या मिरवणुकीत पारध पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी