मुंबई पोलीस आता आणखी स्मार्ट – विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण!
Mumbai Police is now even smarter – various initiatives inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis!

मुंबई पोलीस आता आणखी स्मार्ट – विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण!
मुंबई, दि. ७ एप्रिल २०२५: मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयुक्तालयात विविध नागरिक-केंद्रित उपक्रम, अद्ययावत सुविधा आणि नूतनीकृत सभागृहांचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “मुंबई पोलिसांनी १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये नागरिककेंद्री सुविधा निर्माण करणे आणि स्वच्छता राखण्याचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांवरील त्वरित कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३०’ च्या चित्रफितीचे निर्माते साहिल कृष्णानी आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नूतनीकृत ‘उत्कर्ष’ सभागृहाच्या सौंदर्यीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अता ऊर शेख यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले.
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे. ‘भरोसा सेल’ च्या माध्यमातून पीडित महिलांना विविध प्रकारची मदत मिळत आहे आणि त्यांच्यासाठी विशेष व्हॅन्सही तयार करण्यात आल्या आहेत.”
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आर्थिक गुन्हे, खंडणी आणि लैंगिक गुन्हे हे त्यात प्रमुख आहेत. या गुन्ह्यांवर तातडीने आणि प्रभावी कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई पोलिसांना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ३ नवीन सायबर सुरक्षा लॅब उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये महासायबर हेडक्वार्टरची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर १९३० आणि राज्य स्तरावर १९४५ असे दोन हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहेत. या दोन्हीमध्ये समन्वय साधून एकच प्रभावी हेल्पलाईन क्रमांक वापरण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
नवीन फौजदारी कायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नवीन ३ फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेक वर्षांनंतर आपल्या पोलीस दल आणि न्यायव्यवस्थेचे १००% भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न या कायद्यांद्वारे होत आहे. या बदलांमुळे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे शक्य होणार असून न्यायप्रक्रियेला गती मिळणार आहे. यासाठी पोलीस दलाचे पूर्णपणे सज्ज असणे आवश्यक आहे. ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत संपूर्ण पोलीस दलाला या नवीन कायद्यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला त्वरित न्याय मिळवून देण्यावर भर देणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई पोलिसांच्या आधुनिकीकरणाच्या या प्रयत्नांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.