पारध येथे श्री बालाजी उत्सवास प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
By तेजराव दांडगे

पारध येथे श्री बालाजी उत्सवास प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पारध, दि. 03: भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील श्री बालाजी उत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. या उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजता बालाजी मंदिरासमोर महेश देशमुख (पत्रेसरकार) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गणेश देशमुख, कडुबा देशमुख, शरदचंद्र देशमुख, श्याम देशमुख, चेतन देशमुख, अमृत देशमुख, संजय देशमुख, रामराव देशमुख यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी रात्री ८ वाजता येथील बालाजी मंदिरापासून बालाजी महाराजांच्या पालखी काढण्यात आली. तरुण मंडळींकडून लाठीकाठी, मुगदल, दांडपट्टा, फुगडी आदी मैदानी खेळ सादर करण्यात आले.
रविवारी सकाळी श्रीराम नवमी निमित्त नवभारत युवा प्रतिष्ठानच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पारध येथील युवा कीर्तनकार अंबादास महाराज लोखंडे यांच्या नेतृत्वात सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान भगवान गाडेकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. ९ एप्रिल रोजी रात्री मोनिकाताई खाडे यांचे कीर्तन होईल. गुरुवारी पहाटे महादेवाची स्वारी निघेल. तर रात्री ९ ते ११ या वेळेत स्थानिक नाट्य कलावंत नाटक सादर करणार आहेत. शुक्रवारी पहाटे देवीची स्वारी निघेल. या उत्सवादरम्यान १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल.