Jalna: पारध येथे शेतातून दोन बैलांची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पारध येथे शेतातून दोन बैलांची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पारध, दि. 28: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ८० हजार रुपये किंमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना २७ एप्रिल २०२५ च्या रात्री ते २८ एप्रिल २०२५ च्या सकाळी दरम्यान घडली.
फिर्यादी संजय किसनराव देशमुख (वय ५० वर्षे, रा. पारध) यांनी यासंदर्भात पारध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेले लालसर भुरकट रंगाचे आणि उभे शिंग असलेले दोन बैल चोरीला गेले आहेत. या बैलांची अंदाजित किंमत ८० हजार रुपये आहे.
आज सकाळी जेव्हा श्री. देशमुख यांना बैलांच्या चोरीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पारध पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक १०५/२०२४, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. एन. सिनकर करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. जी. सरडे यांच्याशी ९५५२५२७६१३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.