पिंपळगाव रेणुकाई-भोकरदन मार्गावर रात्री झालेल्या त्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, अनेक जखमी, हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By गौतम वाघ

पिंपळगाव रेणुकाई-भोकरदन मार्गावर रात्री झालेल्या त्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, अनेक जखमी, हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भरधाव हायवा ठरतोय धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष
पारध, दि. 1 मे 2025: पिंपळगाव रेणुकाई-भोकरदन मार्गावर काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास रेलगाव फाट्याजवळील पी. के. कॉर्नर हॉटेलजवळ एका हृदयद्रावक अपघातात दोन महिलांचा बळी गेला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. भोकरदनकडून येणाऱ्या MH 40 BF 6057 क्रमांकाच्या हायवा ट्रक चालकाने निष्काळजीपणे MH 04 GR 3617 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपला जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत अलकाबाई कृष्णा बोरसे (वय 52, रा. सिल्लोड शहर) आणि शांताबाई गायकवाड (रा. सिल्लोड शहर) या दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुनिल जगन्नाथ परणकर (वय 32, व्यवसाय आचारी/शेती, रा. पिंपळगाव रेणुकाई) यांच्यासह काही महिला व पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी सुनिल परणकर यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमुळे हायवा चालकाला अंदाज आला नाही आणि गाडीच्या लाईटचा थेट फोकस त्यांच्या डोळ्यावर पडला. याच कारणामुळे चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून हा भीषण अपघात घडवला.
या घटनेनंतर भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. नेमाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष जीवावर बेतले
या मार्गावर रात्रीच्या वेळी रेतीने भरलेले हायवा अतिशय वेगाने धावत असतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही हायवा तर बिना नंबर प्लेटचेही असतात. या बेकायदेशीर वाहतुकीकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच निष्काळजीपणामुळे आज दोन निष्पाप जीव गेले असून, याहूनही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.