पारध-धामणगाव रस्ता: मराठवाड्याच्या अस्मितेवरचा ‘खड्ड्यांचा’ डाग!
By तेजराव दांडगे

पारध-धामणगाव रस्ता: मराठवाड्याच्या अस्मितेवरचा ‘खड्ड्यांचा’ डाग!
पारध-धामणगाव रस्त्याची ‘खड्डेमय’ कहाणी
पारध, दि. 27: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध ते बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव (मराठवाडा-विदर्भ सीमा) हा रस्ता म्हणजे केवळ खड्ड्यांचे साम्राज्य नाही, तर मराठवाड्याच्या विकासाच्या आणि प्रशासकीय कार्यक्षमतेच्या प्रतिमेवर उमटलेला एक मोठा डाग बनला असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आज प्रवाशांसाठी ‘अग्निपरीक्षा’ ठरत असून, स्थानिक नागरिकांसाठी तो अपमानाचा विषयही बनत आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यातील पहिल्याच सरींनी या रस्त्याची दयनीय अवस्था अक्षरशः चव्हाट्यावर आणली आहे. जागोजागी पडलेले भलेमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि चिखल यामुळे वाहन चालवणे म्हणजे दररोजची तारेवरची कसरत झाली आहे. दुचाकीस्वार घसरून पडणे, तर चारचाकी वाहनांचे नुकसान होणे हे नित्याचेच झाले आहे. मात्र, याहूनही अधिक वेदनादायक बाब म्हणजे, या रस्त्यामुळे मराठवाड्याच्या अस्मितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे.
विदर्भातून येणारे नातेवाईक जेव्हा या रस्त्याने प्रवास करून मराठवाड्यातील आपल्या आप्तेष्टांना “काय तुमचा मराठवाडा, काय तुमचे रस्ते?” असे बोचरे टोमणे मारतात, तेव्हा स्थानिक नागरिकांना ते निमूटपणे ऐकून घ्यावे लागते. असे स्थानिक नागरीक सांगतात. हा केवळ रस्त्याच्या दुर्दशेचा प्रश्न नसून, तो मराठवाड्याच्या आत्मसन्मानाचा प्रश्न बनला असल्याची चर्चा होत आहे. निवडणुका आल्या की याच रस्त्याची चर्चा होते, आश्वासनांची खैरात होते, पण प्रत्यक्षात ‘जैसे थे’ परिस्थिती कायम राहते, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या या जीवनवाहिनीची दुरवस्था दूर करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, तसेच मराठवाड्यावरील हा ‘खड्ड्यांचा’ डाग पुसून टाकावा. अन्यथा, हा रस्ता केवळ खड्ड्यांचा नव्हे, तर ‘उपेक्षांचा’ रस्ता म्हणून इतिहासात नोंदवला जाईल. असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.