जालन्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल दोघांना अटक; 1 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त, 5 गुन्हे उघडकीस
By तेजराव दांडगे

जालन्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल दोघांना अटक; 1 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त, 5 गुन्हे उघडकीस
जालना, दि. 08 : शहरातील घरफोड्यांच्या मालिकेला लगाम घालण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. पोस्टे कदीम जालना आणि तालुका जालना हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपीतांकडून चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक 7 मे 2025 रोजी पोस्टे कदीम जालना हद्दीतील विद्युत कॉलनी येथे शिवप्रसाद काळे यांच्या घरी ते बाहेरगावी असताना तीन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी पोलीस अधीक्षक जालना यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसून तपास करत असताना, 7 मे 2025 रोजी त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तकदीरसिंग टिटूसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना) याने त्याचे साथीदार अजय उर्फ भज्या साबळे (रा. वाल्मीक नगर, गांधीनगर जालना) आणि पवनसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाल करत अजय उर्फ भज्या साबळे आणि पवनसिंग टाक यांना शिवाजी महाराज पुतळा, जालना येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी तकदीरसिंग टाक याच्यासह मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत या आरोपीतांनी पोस्टे तालुका जालना हद्दीतील आणखी चार गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या दोन्ही आरोपीतांकडून चोरी केलेले सोने, चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे 4 आणि मोटारसायकल चोरीचा 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेल्या आरोपीतांना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पहरे, गोपाल गांशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, ईशांद पटेल, सतीष श्रीवास, संदीप चिचोले, रमेश काळे यांच्या पथकाने केली आहे.