पिंपळगाव रेणुकाई शिवारात वीज कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी
By देवानंद बोर्डे

पिंपळगाव रेणुकाई शिवारात वीज कोसळून दोघांचा मृत्यू, एक जखमी
पिंपळगाव रेणुकाई, दि. १९: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात आज दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. जोरदार विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात झाडाखाली उभे असताना वीज कोसळल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत गणेश प्रकाश जाधव (वय ३५) आणि सचिन विलास बावस्कर (वय २८) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर प्रशांत रमेश सोनवणे हा तरुण गंभीर जखमी असून, त्याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोठाकोळी येथील गणेश जाधव, सचिन बावस्कर आणि प्रशांत सोनवणे हे तिघेही तरुण आज सकाळी पिंपळगाव रेणुकाई येथे कामासाठी आले होते.
दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली उभे राहिले असताना, दुर्दैवाने त्यांच्यावर वीज कोसळली.
या दुर्घटनेत गणेश जाधव आणि सचिन बावस्कर यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत सोनवणे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मृत गणेश जाधव हे विवाहित असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तर सचिन बावस्कर हा तरुण अविवाहित होता. या हृदयद्रावक घटनेमुळे पिंपळगाव रेणुकाई आणि कोठाकोळी परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.