जालना बसस्थानकात चोरीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस; सदर बाजार पोलिसांची तत्पर कारवाई
By तेजराव दांडगे

जालना बसस्थानकात चोरीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस; सदर बाजार पोलिसांची तत्पर कारवाई
जालना, दि. 23: दिनांक २३/०४/२०२५ रोजी जालना शहरातील बसस्थानकात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. निर्मला राजेंद्र व्यवहारे (वय ५० वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत अवघ्या एका तासात या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निर्मला व्यवहारे या सिल्लोड येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण चोरले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी डीबी पथकाला तातडीने तपास करण्याचे आदेश दिले.
सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथक बसस्थानक परिसरात आरोपीताचा शोध घेत असताना त्यांना एक संशयित महिला आढळून आली. महिला पोलीस हवालदार गायकवाड यांच्या मदतीने पोलिसांनी तिची विचारपूस केली. तिने आपले नाव कलावती सखाराम शिराळे (वय २० वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. पाथरी, जि. परभणी) असे सांगितले. तिच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने महिला पोलीस हवालदार गायकवाड यांनी महिला पंचांसमक्ष तिची अंगझडती घेतली.
या झडतीत तिच्याकडे काळे आणि लाल मणी असलेले आणि मध्यभागी पेंडल असलेले अंदाजे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण सापडले. या गंठणाची अंदाजित किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. पोलिसांनी तात्काळ हे गंठण जप्त केले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस हवालदार पटेल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर, दुर्गेश गोफणे, अजीम शेख, लोढे आणि कटकम यांनी केली आहे. सदर बाजार पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.